Home नागपूर गुलमोहर………सौ. धनश्री धारकर

गुलमोहर………सौ. धनश्री धारकर

0
गुलमोहर………सौ. धनश्री धारकर

गुलमोहर………

स्वच्छ सकाळ अवचित येते
नि जाते सोबत घेऊन
चार दोन कोस चालून
का देते हात सोडून
रणरणती दुपार जेव्हा
ठेपते माथ्यावर येऊन
आत बाहेर नुसती लाही
गारवा शोधावा कुठून
अहो सोसवत नाही म्हणुन
ते उन्हं थोडीच कलतं
तेव्हाच अवचित वळणावर
गुलमोहर सावली धरतं
जणू बहरलेला वणवा याने
सूर्याशी सोयरीक बांधली
एवढा निखा-यापरी सजून
कशी गारवा देते सावली?
प्रेमानं झेलतो आगपाखड
या रवीचा स्वभाव ओळखून
तरीच फुलतो भर वैशाखात
ते ही आत ओलावा टिकवून
मग मनाचा गुलमोहर होतो
त्या वाटेवर विसावतांना
का सूर्य ही प्रेमात पडतो?
असा संध्येकडे झुकताना
आता मात्रं कळलय मनाला
काळच सूर्याला शमवू शकतो
नि गुलमोहर बहरायला सुद्धा
हाच सूर्य आधी तापावा लागतो

©️®️🖋  सौ. धनश्री धारकर