पुरण पोळी व आंब्याचा रस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10751*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

293

पुरण पोळी व आंब्याचा रस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा

विदर्भ वतन,नरखेड : पुरण पोळी व आंब्याचा रस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा झाल्याची घटना नरखेड तालुक्यातील मेंढला येथे घडली. पाहुणपणाकरिता घरी आलेल्या चिमुकल्यासह सहा जणांनी मंगळवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास आंब्याचा रस व पूरण पोळी खाल्ली. काही वेळानंतर कुटुंबातील ६ जणांना उलटी, तोंडात फेस व पोटदुखी जाणवू लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विषबाधा झालेल्यांवर लगेच ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने मेडिकल नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.
विषबाधा झालेल्यांमध्ये गंगाधर दुर्वे यांचा मुलगा अंकुश गंगाधर दुर्वे (वय ३0), सून सीमा अंकुश दुर्वे (वय २६), बाळ भाविका अंकुश दुर्वे (वय ३), अलकेश अंकुश दुर्वे (वय ११), मुलीकडे पाहुणे म्हणून आलेले नातू वेदाश बबलू उईके (वय ११), सुमीत बबलू उईके (वय ५) यांचा समावेश आहे.
२८ जून रोजी सायंकाळी गंगाधराव दुर्वे यांच्या घरी पाहुण्यांना आंब्याचा रस व पुरणाच्या पोळ्यांचा पाहूणचार होता. मात्र, रात्रीचा उरलेला आंब्याचा रस व पुरणाची पोळी मंगळवारी सकाळी खाल्ल्यामुळे सर्वांना उलटी, तोंडात फेस व पोटदुखी जाणवू लागली होती. त्यामुळे सर्वांची तब्येत खालावत गेली. विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे कळू शकले नाही. ही बाब कळताच उपसरपंच अशोक राऊत यांनी विषबाधा झालेल्यांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी, यासाठी माजी उपसभापती वैभव दळवी यांच्या साहाय्याने ग्रामीण रुग्णालयात भरती केले. रुग्णांची गंभीर परिस्थिती लक्षात घेता रुग्णालय अधीक्षक डॉ. वनकळस, डॉ. धांडे तसेच आरोग्य विभागाच्या संपूर्ण कर्मचा-यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले.
यावेळी मदतीसाठी विवेक बालपांडे, मझर पठाण धावून आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांना लगेच १0८ व वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या अँबुलन्सने नागपूरला पाठविण्यात आले. येथे सलीलदादा देशमुख यांच्यासोबत संपर्क साधून योग्य उपचार मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहे.