जम्मू एयरबेसवरील ड्रोन हल्ल्यानंतर……. !-कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10716*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

226

जम्मू एयरबेसवरील ड्रोन हल्ल्यानंतर……. !

–   कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

 

शनिवार २६/ रविवार २७ जून,२०२१च्या रात्री, एक वाजून बत्तीस मिनिट ते ४२  या दहा मिनिटांमधे, भारतातील जिहादी युद्धाचा आयाम/आवाका संपूर्णपणे बदलून गेला. त्या रात्री जम्मूच्या एयर बेसवर दोन बॉम्ब हल्ले झालेत. स्रोत/प्रसारमाध्यमांनुसार,त्यात कुठलीही जीव हानी झाली नाही. एयरफोर्सचे  दोन एयरमेन  जुजबी जखमी झाले. पहिल्या बॉम्बमुळे येथील एका इमारतीच्या स्लॅबला साधारणतः दीड दोन फूट व्यासाच भोक पडल.आणि त्याच्या शॉक वेव्ह्जमुळे खालच्या खोलीतील दरवाजे आणि सामानाला थोडी फार क्षती पोचली. दुसरा बॉम्ब तेथून थोड्या जमिनीवर पडून तेथे पडलेला दोन तीन फूट लांब रुंद आणि बारा पंधरा इंच खोल खड्डा चलचित्र वाहिन्यांमधील चित्रफीतींमधे दिसत होता.हा बॉम्ब पडण्याच्या जागेपासून केवळ ३५-४० मीटर दूर बेसमधील हेलिकॉप्टर हँगर्स होते. काँबिन्ग ऑपरेशनमधे शोधकर्त्यांना त्या इलाक्यात एक पाच सहा किलों वजनी  इम्प्रोव्हाइझ्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी) मिळाल. झालेली हानी पहाता स्फोट झालेले बॉम्बदेखील त्याच वजनाचे असावेत तज्ञांचा कयास आहे.

स्फोटानंतर सकाळी दहा अकराच्या दरम्यान; वेस्टर्न एयर कमांड चीफ,वायूसेना उपाध्यक्ष, डायरेक्टर जनरल सीआरपीएफ,जम्मू काश्मिरचे डायरेक्टर जनरल पोलीस,सेक्टर एनएसजी प्रमुख,सेक्टर डिझास्टर मॅनेजमेंट प्रमुख,पॅरा कमांडो टीम्स,बॉम्ब डिस्पोजल स्क्वाड्स आणि इतर विशेषज्ञ;जम्मू एयर बेसमधे दाखल झालेत. पुढील काही दिवस; हे स्फोट का व कसे झाले,यामध्ये टीएनटी, आरडीएक्स किंवा प्लास्टिक पैकी कोणत्या एक्स्प्लोझिव्हचा  वापर झाला, या घटनेमागे कोण होत,हल्ला करणाऱ्यांचा  उद्देश काय,हल्ला ड्रोनद्वारे सीमापारच्या  पाकिस्तानी भूमीवरून झाला की स्थानिक जिहाद्यांनी स्फोटक वापरून केला, जर ड्रोन असतील तर संख्या कीती,एवढ्या महत्वाच्या बेसवर कोणालाही न कळत हल्ला झालाच कसा, हे इंटलिजन्स फेल्युअर होत का,याला एयर बेसनी काय व कसा रिस्पॉन्स दिला, अशा अनेक प्रश्नांवर;उलटसुलट चर्चा होत राहील.

संरक्षण मंत्रालय व वायुसेनेनी अत्यल्प शब्दांमधे, असा हल्ला झाला,,यात ड्रोन्सचा वापर झाला असण्याची संभावना आहे आणि  घटनेच्या सखोल चौकशीसाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी ऑर्डर करण्यात आली आहे,एवढीच माहिती दिली. चलचित्र वाहिन्यांवर नेहमीप्रमाणे सकाळपासूनच; जेन्युईन डिफेन्स ऍनालिस्टस,स्वधनमान्य/नवखे/ हवसे/गवसे संरक्षणतज्ञ आणि संरक्षण विषयक चर्चांमधे रस असणाऱ्यांच्या सक्रिय सहभागानी,चर्चेची झुंबड उडाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी,जम्मूजवळील  रत्नूचक आणि कालूचक कॅंटोन्मेंट्सवर ड्रोन उड्डाण करतांना दिसल्यावर तेथील सेंट्रींनी त्यांच्यावर फायर करून  पाडण्याचा असफल प्रयत्न केला. उत्तर भारतातील सहा एयरबेसेसना हाय अलर्टवर नेण्यात आल.

संरक्षण विश्लेषक या नात्यानी वरील प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असता काही बाबी प्रकर्षाने जाणवल्या/समोर आल्यात.अर्थात एयरफोर्सची कोर्ट ऑफ इन्क्वायरी यावर चर्वितचरण करेल यात शंकाच नाही. हल्लाकर्त्यांनी कुठलेही पुरावे,टेल टेल साईन्स किंवा क्ल्युज मागे सोडले नसल्यामुळे; हल्ला ड्रोन्सद्वारे झाला की मानवी होता (वेपनाइझ्ड ऑर मॅन्युअल अटॅक),जर ड्रोननी झाला तर ते सीमापारहून आलेत की जम्मूमधूनच लॉन्च केल्या गेले,जर मानवी असेल तर इमारतीच्या छतावर बॉम्ब कसा टाकल्या गेला आणि दुसऱ्याचा स्फोट जमिनीवरच का/कसा झाला,हल्ला झाल्यावर ड्रोन्स/जिहादी कुठे गायब झाले,स्फोटाच्या जागेवर मिळालेल्या पुराव्यांवरून एक्स्प्लोझिव्हची ओळख पटली का; याची उत्तर शोधावी लागतील. जरी या हल्ल्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध नसली तरी उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे या हल्ल्यांमधून अनेक सामरिक निष्कर्ष काढता येतात. भारतीय एयरबेस/कॅंटोन्मेंटवर झालेला पहिल्या ड्रोन हल्ल्यामुळे ही,जिहाद्यांनी अंगिकारलेल्या/त्यांना मिळालेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या सामरिक समन्वयाची निशाणी आहे. संरक्षण विश्लेषकांच्या भूमिकेतून या हल्ल्याची मिमांसा केल्यास,  खालील गोष्टी उजागर होतात.

एक) मागील काही दिवसांपासून पाकिस्तानी आयएसआय आणि तेथील खालिस्तान्यांनी पंजाब राजस्थानमधे हेक्झाकॉप्टर ड्रोन्सद्वारा एके ४७ रायफल्स, पिस्तुल व मोठ्या प्रमाणात स्फोटक पाठवलीत.यामुळे,मागील काही वर्षांमधे  भारत पाक सीमेवर गर्द/शस्त्रास्त्र/स्फोटकांची चोरटी आयात आणि जिहाद्यांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी,काही करोड रुपये खर्चून उभारलेल्या,काटेरी कुंपण संकल्पनेचा फज्जा उडून,ड्रोन्सद्वारे  होणाऱ्या हवाई घुसखोरी स्वरूपी  आतंकवादाचा ओनामा झाला.ही गहन चिंतेची बाब आहे.

दोन) जम्मू एयर बेसवर ड्रोनद्वारे झालेल्या हल्ल्यातील ड्रोन एकतर सीमापारहून आले असतील किंवा जिहाद्यांच्या स्लीपर सेलनी जम्मूमधूनच  लॉंच केले असतील. अ) जर ड्रोन सीमापारहून आले असतील तर;त्यांच्या ३० किलोमीटर आवागमन पल्ल्याची रेंज लक्षात घेता ते,जम्मूपासून १४-१५ किलोमीटरवर असलेल्या,आरएसपूरा मार्गेच आले असणार. पाकिस्तानपाशी,एकूण १५-२० किलो स्फोटक असलेल्या,दोन ते चार  हलक्या वजनाच्या आयईडी बसवता येणारे,लहान व स्वस्त चीनी ड्रोन्स मोठ्या संख्येत आहेत. टार्गेट साईटवर फक्त दोनच स्फोट झालेत आणि एक साबूत आयईडी मिळाली.त्यामुळे एकच ड्रोन आल,त्यानी तीन आयईडी डिस्चार्ज केल्यात आणि तीसरीचा स्फोट न झाल्यामुळे ते,चौथ्या आयईडीला घेऊन परत गेल असेल असा निष्कर्ष काढता येतो.मग प्रश्न येतो की त्यांना सीमेच्या आतील/सीमेवरील रडार्सनी का पकडल नाही किंवा मधल्या भूभागामध्ये तैनात असलेल्या सेंट्रींना या ड्रोनचा आवाज का ऐकू आला नाही/नसेल? तर ड्रोननी,जमिनीपासून पंधरा ते वीस फूट उंचीवर,नाल्यांच्या कंटूर्समधून  उड्डाण केल असणार आणि ते त्याच मार्गे परतही गेल्यामुळे हे झालं असेल. ब) जर ड्रोन जम्मूमधूनच लॉन्च केल्या गेल तर आपल्या लॉंच साईटपासून ते इमारतींना चुकवत टार्गेटपर्यंत कस आल/परत गेल हा प्रश्न उभा राहतो. त्या करता जिहाद्यांनी,जमिनीचे अगदि मायन्युटेस्ट डिटेल्स असणाऱ्या  गुगल मॅपचा उपयोग केला असणार.  क) या दोन्ही पर्यायांमधे,आपल्या येथील लोकांनी हल्लाकर्त्यांना सर्वंकष,सक्रिय मदत केली असेल यात शंकाच नाही. भारतात दगड उचलला तर जयचंद सापडेल अशी परिस्थिती आहे.

तीन)  जर हा जिहाद्यांनी केलेला मानवी हल्ला असेल तर;एयरबेसच्या बाहेरून ग्रेनेड लॉंचरचा मारा करण्यासाठी दोन,टेहाळणी/संरक्षण देण्यासाठी दोन आणि “गेट अवे  व्हेईकल”  चालवण्या/राखण करण्यासाठी एक/दोन; अशा पाच/सहा जिहाद्यांनी हे काम तडीस नेल असेल असा विचार केल्यास तो चूक नसेल. यासाठी पाकिस्तानमधून आलेल्या जिहाद्यांना जम्मूपर्यंत पोचून टार्गेट रिकॉनिसन्स करण्यासाठी तीन चार  दिवस लागले असतील. प्लॅन पक्का झाल्यावर,ग्रेनेड फायर करून ते जम्मूतील सेफ हाऊस/सीमापार गेले असणार. अर्थात यातही त्यांना भारतीय जयचंदांची सर्वकष,सक्रिय मदत मिळालीच असेल.

चार) इमारतीच्या छताला पडलेल्या भगदाडावरून हे प्रत्ययाला येत की हल्ला ड्रोनद्वारेच झाला आहे. ग्रेनेडनी अशा प्रकारच भगदाड पडत नाही.ज्या प्रकारच भगदाड पडून आत,जसा विध्वंस झाला त्यावरून हे प्रत्ययाला येत की आयईडी टार्गेटवर लंबरेषेत आदळली (परपेंडीक्युलर स्ट्राईक) असणार. लक्ष्यावर अशा प्रकारचा लंब रेषेतील मारा करण्यासाठी ड्रोननी,अचूक उड्डाण मार्ग व पिनपॉईंट स्ट्राईकची संयोजना (प्रिसाईझली फ्लोन अटॅक प्रोफाइल) अंगिकारली असणार. रात्रीच्या मिट्ट काळ्या अंधारात; अचूक उड्डाण करणाऱ्या ड्रोनला, मानवीय पद्धतींनी कंट्रोल करण अशक्यप्राय आहे/असत.अशा प्रकारच स्वायत्त पर्यटन (ऑटोनॉमस नेव्हिगेशन) आणि त्या नंतरच्या अचूक हल्ल्यासाठी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असत आणि ते या हल्ल्यात पहायला मिळाल. ड्रोन्सच्या अंतीम प्रवासात, सूक्ष्म लक्ष्यावर अचूक मारा करण्यासाठी (पिन पॉईंट हिटिंग कॅपॅबिलिटी),जीपीएस कोऑर्डिनेट्सचा वापर करणारी इन्फ्रारेड सेन्सिंग डिव्हाइसेस वापरण्यात आली असणार यात शंकाच नाही.

पाच)  एयर डिफेन्स कव्हर आणि रडार डिटेक्शनमधून वाचवण्यासाठी, जमिनीपासून ५०-१०० फुटांच्या उंचीवरून ड्रोन्सना इतक्या दूर/लांब उड्डाण करवण्याच्या कठीण व किचकट कारवाई साठी,प्रचंड “मिलिटरी इंटलिजन्सअँड एक्सपर्टिझ”ची आवश्यकता असते/लागते.पण भारतीय रडार सिस्टीमचा डोळा चुकवून ड्रोननी जो विध्वंस केला त्या वरून ‘लो लेव्हल फ्लाईंग करणाऱ्या संसाधनांचा शोध घेण्यासाठी सीमेवर/सीमेच्या आत लावलेल्या भारतीय रडार्सची मुकर्रर जागा चुकीची  असावी अस म्हणता येईल. ज्या अर्थी पाकिस्तानी ड्रोन कंट्रोलर्सना जम्मू एयर बेसवरील हँगर सापडू शकला नाही त्या अर्थी हे ऑपरेशन अचूक सामरिक कौशल्याने तडीस नेण्यात आल नाही अस म्हटल्यास ते वावग होणार नाही.

सहा) भारत/जगात;१२-१५ किलोमीटर्सचा पल्ला,जीपीएस,व्हर्टिकल टेकऑफ/लँडिंग कॅपेबिलिटी असणारी,टॅरोट ६८० प्रो” किंवा “डीजेआय एम ६०० मॅट्रेस सारखी स्वस्त चीनी क्वाडकॉप्टर्स/ हेक्झाकॉप्टर्स/ मिनी हेलिकॉप्टर ड्रोन्स,मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.जरी ही संसाधन, “फोटोग्राफिक/सर्व्हिंग टूल्स”च्या गोंडस नावाखाली विकल्या जात असली तरी यांच्याकडून दहशतवादी हल्ला केल्या जाऊ शकतो. अशी संसाधन,१,५०,००० ते ४,५०,००० रुपयांपर्यंत मिळतात. यांची कमी किंमत व सोप्या तंत्रज्ञानामुळे, लहान हवाई हल्ल्यात त्याचा वापर सहज सुलभ असतो.शिवाय, हल्ला करणारा अनामिक राहातो. लहान ड्रोन्समधे “वायरलेस कंट्रोल सिस्टीम” असल्यामुळे,पंधरा चौरस किलोमीटरचा क्षेत्रात,ह्या ड्रोन्सना कुठूनही कार्यरत करता येत.यांची गती २० मीटर्स प्रति सेकण्ड व आकार छोटा पण ऑपरेटिंग एरिया मोठा असल्यामुळे,यांच्या ऑपरेटरला किंवा यांना हुड्कण (ट्रेसिंग) फार कठीण असत.भारतात आजमितीला सर्व प्रकारचे ८०,००० वर ड्रोन्स उड्डाण करताहेत.

सात) सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीनी डिसेंबर,२०१८मधे; सर्व ड्रोन्सनी स्वतःला रजिस्टर करून युनिक आयडेन्टिफिकेशन नंबर घेण आवश्यक करून,ड्रोननी, विमानतळ/ संवेदनशील सैनिकी,औद्योगिक व व्यापारी संस्थानांजवळ न येता,मिनिस्ट्रीचा मोबाईल ऍप “नो परमिशन नो टेकऑफ”च्या आदेशाच सक्त पालन करायचे करण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र ,दहशतवादी कधीच रजिस्टर्ड ड्रोन्सचा वापर करणार नाहीत. अशा पुंड ड्रोन्सना हुडकण्या/ओळखण्यासाठी आपल्याला, इस्रायलसारखी “आयर्न डोम एयर डिफेन्स सिस्टीम” लावून आणि “रेडियो फ्रिक्वेन्सी स्कॅनर टेक्नॉलॉजी”चा वापर करून नष्ट कराव लागेल.“काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टीम”च्या सहाय्यानी पुंड ड्रोन्सना हुडकून काढत त्यांचा पाठलाग करून त्यांना नष्ट करण्याच्या (डिटेक्शन,ट्रेसिंग अँड इण्टरसेप्शन) क्षमतेचा त्वरित अंगीकार करण ही या पुढे भारताची प्राथमिक आवश्यकता असेल. ड्रोन्सना हुडकण आणि त्यांचा पाठलाग ही पारंपरिक रडार्सच्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे कारण ते वेगानी उड्डाण करणाऱ्या धातूंनी बनलेल्या विमानांना हुडाकू शकतात.ड्रोन,लहान आकार व फायबर ग्लासचे असल्यामुळे,रडारवर एखाद्या सूक्ष्म टिंबासारखे दितात आणि रडार ऑपरेटरच्या नजरेतून निसटतात.ड्रोन्सना हुडकण्यासाठी “व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी रडार्स”ची आवश्यकता असते.ड्रोन्सचा नाश करण्यासाठी “हार्ड अँड सॉफ्ट किल मेझर्स”चा समन्वयी वापर करण आवश्यक असत.

आठ) ड्रोन्सच्या या हवाई घुसखोरीला आळा कसा घालायचा,स्फोटकांनी भरलेल ड्रोन एखाद्या नागरिकी विमानाच्या टेक ऑफ/लँडिंगच्या वेळी समोर आल तर काय करायच किंवा एखाद कामिकाझे ड्रोन,कुंभमेळा/क्रिकेट मॅच/धार्मिक मिरवणूक/राजकीय सभा/राजपथावरील परेड/व्हीआयपी एन्क्लोझर सारख्या ठिकाणांवर येऊन आदळल तर काय करायच;हे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप/ वायुसेना/ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन अँड सिक्युरिटी/संरक्षण व गृहखात्या समोरील फार मोठ आव्हान आहे. यासाठी, सरकार/ डीआरडीओला “काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टीम”ची त्वरित निर्मिती करून/ऑफ द शेल्फ विकत घेऊन, त्यांच्या “फिल्ड ट्रायल्स”च आयोजन कराव लागेल.त्याच बरोबर;संरक्षण मंत्रालय,ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च व मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनना, संवेदनशील ठिकाणांचा आढावा घेऊन,पुंड ड्रोन्सचा  हल्ला झाल्यास सुरक्षादलांची जबाबदारी/कार्य पद्धती आणि रडार्स/अँटी एयरक्राफ्ट गन्स/एयर डिफेन्सची  संरचना कशी करायची यांची “स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स” बनवावी लागतील.ड्रोन्सना हुडकण आणि त्यांच्यावर कारवाई करण  यासाठी केवळ ९० सेकंदांचा वेळ असतो.

नऊ) स्मॉल ड्रोन्स हे घरी बनवता येतात.ते खुल्या बाजारातही उपलब्ध असल्यामुळे,त्यांचा सर्वदूर वापर होतो आहे.जिहादी; स्मॉल ड्रोन्स बनवून/किंवा विकत घेऊन त्यांच्यात हवे/आवश्यक असणारे,गरजेपुरते परिवर्तन किंवा मर्यादित बदल अगदी सहज करू शकतात.या ड्रोनवर लावलेल्या आयईडीत कुठलंही स्फोटक वापरल तरी ते विध्वंस करेलच. जरी फॉरेन्सिक  रिपोर्ट आले नसले तरी स्फोटकांचे कण मिळायला ज्या अडचणी आल्यात त्यानुसार,जम्मू एयरबेसवरील हल्ल्यात प्लास्टिक एक्स्प्लोझिव्हचा वापर झाला असण्याची शक्यता मोठी आहे.जम्मू एयरबेसवर करण्यात आलेल बॉम्बिंग/ स्फोट,अति घातक/मारक नसला तरी त्यामुळे आपल्यावर मनोवैज्ञानिक आणि रसदी दबाव/ तणाव (सायकॉलॉजिकल अँड लॉजिस्टिक प्रेशर/स्ट्रेन) पडेल  यात शंकाच नाही.लघु आकारामुळे ड्रोन्स भविष्यात, सेनेवर हावी होतील. त्यामुळे,अँटी/काउंटर ड्रोन टूल्स तयार/निर्माण पद्धतीचा जलद विकास,ही काळाची गरज आहे. स्मॉल ड्रोन्स क्षेत्रातील जिहादी कुरघोडी आपल्यासाठी सामरिक दृष्ट्या हानीकारक असेल.द स्टेट कॅन नॉट सरेंडर धिस कॅपॅबिलिटी अँड अपॉर्च्युनिटी टू मिलिटन्ट्स  अँड मस्ट कीप अप इन फ्युचर.

दहा)  जिहादी फिजिकल स्ट्राईक करोत किंवा ड्रोनद्वारे,त्यांना सफल होण्यासाठी पुरवठ्याच्या  मानवी व संसाधनीय नेटवर्कची आवश्यकता असतेच.दुर्दैवानी अस नेटवर्क भारतात कोळ्याच्या जाळ्यासारख “व्हास्ट बट अनसीन”रित्या पसरल आहे.पोलीस/सुरक्षाबल संशयितांना ताब्यात घेतात पण कोर्टात केस उभी राहिल्यावर कुशल वकिलाच्या सहाय्यानी ते संशयित सहज सुटतात.जिहाद्यांच्या बाबतीत हे प्रकर्षानी जाणवत/उजागर होत.ही न्यायप्रणालीमधील  त्रुटी आहे की सरकारची हतबलता हे आमच्या सारख्यांसाठी अगम्य आहे.जो पर्यंत कायद्यातील लूपहोल्स बंद होत/केल्या जात नाही तो पर्यंत जिहादी वर्चस्मा कायम राहील.

जम्मू एयरबेसवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे भारतीय सामरिक वातावरण निःसंशयपणे ढवळून निघेल. आताच त्याचे पडसाद ऐकू येण सुरु झाल आहे. ड्रोन्स आराखड्याची तयारी,बांधणी आणि उत्पादन आता सोप व कमी खर्चाच  झाल आहे.जिहादी स्लीपर सेल्सनी भारतात लहान/छोट्या,कमी पल्ल्यांच्या ड्रोन्सचा वापर अंतर्गत दहशतवादासाठी केला/करायच ठरवल तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतात.चीनच्या डेल्टा विंग छोट्या ड्रोन्सच्या सहाय्यानी जिहादी,मोठ्या शहरांमधील महत्वाच्या संसाधनांवर हल्ला करून हैदोस माजवू शकतात आणि हाच  भावी ड्रोन युद्ध संकल्पनेचा गाभा असणार आहे.

नजदिकी भविष्यात भारतीय उपखंडातील ड्रोन्स,प्रत्यक्ष हवाई हल्ल्यांच स्थान घेतील.ड्रोन्सची महत्ता;सैनिकी,राजकीय व छद्म/प्रच्छन्न  युद्धात निःसंशयपणे वाढतच जाईल त्यामुळे भारतीय वायुसेना, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आणि आर्मी/पोलिसांना या नव्या प्रकारच्या युद्धाला तोंड देण्यासाठी स्वतःला सज्ज करण्या शिवाय पर्यायच नाही.आगामी काळातील राष्ट्र सुरक्षा आयामात ड्रोन्सची अहमियत वाढतच जाणार आहे.जम्मू एयरबेसवरील ड्रोन हल्ला ही त्याची चुणूक होती.धोका ओळखून आधीच उपाय करण हे  सामरिक दूरदृष्टीच लक्षण आहे.”तहान लागल्यावर विहीर खोदण अर्थहीन असत”  हे आर्य चाणक्यांच वचन सदैव ध्यानात ठेवण यातच शहाणपण आहे.

 

२९/०६/२०२१ : १६,भगवाघर कॉलनी,धरमपेठ,नागपूर,१० : ९४२२१४९८७६/abmup५४@gmail.com.