
१७ प्लॉटधारकांची तब्बल २ कोटी २१ लाख ४९ हजार ५00 रुपयांनी फसवणूक
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- शाळेच्या अध्यक्षाने आणि त्याच्या निकटवतीर्यांनी १७ प्लॉट धारकांची तब्बल २ कोटी २१ लाख ४९ हजार रुपयांनी फसवणूक करून त्यांनी विकत घेतलेल्या जमिनीची पॉवर आॅफ अँटर्नी करून ती जमीन दुसर्याच्या नावे केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाठोडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, एस.पी. पब्लिक स्कूलचे अध्यक्ष संजय श्रीराम पेंढारकर (५२) रा. प्लॉट नं. ५५९, हिवरी ले-आऊट हे एस.पी. पब्लिक यांच्या मालकीची वाठोडा परिसरातील मौजा गोन्ही येथे जमीन आहे. या जागेपैकी काही जागेवर त्यांनी शाळा बांधली आणि उर्वरीत जागेवर प्लॉट पाडले. फियार्दी गजानन ज्ञानेश्वर निशाणकर (६४) रा. प्लॉट नं. ७१, एनआयडी गार्डन, उदयनगर आणि इतर १७ जणांनी तेथील प्लॉट खरेदी केले. या प्लॉटधारकांना आरोपीने विक्रीपत्र, अँग्रीमेट, कब्जापत्र करून दिले. त्यासाठी आरोपी पेंढारकरने प्लॉट धारकांकडून एकूण २ कोटी २१ लाख ४९ हजार ५00 रुपये घेतले. पण या जमिनीची पॉवर आॅफ अँटर्नी आरोपी कमलेश हरिचंद नागपाल ( ५0) रा. देशपांडे ले-आऊट, वर्धमाननगर, दादुमल नागपाल आणि रिमा नागपाल यांच्या नावे करून दिली. प्लॉट खरेदी-विक्रीचा संपूर्ण व्यवहार आरोपी दादुमल नागपाल याला माहीत असून सुध्दा त्याने इतरांच्या नावे विक्रीपत्र लावून दिले. आरोपींनी १७ प्लॉटधारकांची तब्बल २ कोटी २१ लाख ४९ हजार ५00 रुपयांनी फसवणूक केली.

