कुटील फसवणूक तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा – कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10591*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

162

कुटील फसवणूक तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा 

– कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

कुटील फसवणूक (डीप फेक्स) हा शब्द प्रयोग जागतिक स्तरावर २०१७मधे अस्तित्वात आला. जनमत;आपल्याला हव तस,हव्या त्या बाजूनी वळवण्यासाठी; कोणताही खरा फोटो, ध्वनीफीत, चित्रफीत आणि/किंवा तत्सम खोटे/खोटारडेपणाला कृत्रिम माहितीच्या (आर्टिफिशियल इंटलिजन्स) सहाय्याने, आपल्याला हवा तसा,हव्या त्या प्रमाणात,स्वतःचा वैचारिक भावनात्मक  मुलामा चढवून लोकांसमोर सादर करणे हे कुटील फसवणुकीच तंत्रज्ञान (डीप फेक टेक्नॉलॉजी) आहे.सध्यातरी याचा वापर, धार्मिक/ राजनीतीक अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि/किंवा सामाजिक ऐक्याची ऐसीतैसी करण्यासाठी केल्या जातो. दोन वर्षांपूर्वी दिल्ली सीमेवर झालेल शाहिनबाग आंदोलन,सध्या सुरु असलेल शेतकरी आंदोलन आणि त्यांचे मॉर्फ केलेले फोटो/बातम्या  जशा आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी उचलून धरल्या त्या  भारतातील कुटील फसवणुकीची ज्वलंत उदाहरण आहेत.टिकटॉकवर टॉम क्रूझचे फोटो,उत्तर कोरियन न्यूज रीडर किम जू हा हिच्या तोंडी नको ती वाक्य,राष्ट्रपती बराक ओबामाची पब्लिक सर्व्हिस अनाउन्समेंट,राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पनी बेल्जीयमच्या नाटो सहभागावर केलेल अश्लाघ्य  भाष्य,फेस बुक प्रायव्हसीवर मार्क झुकरबर्गची टिप्पणी ही कुटील फसवणुकीची ताजी आंतरराष्ट्रीय उदाहरण आहेत.या पुढे,राष्ट्रीय सुरक्षा आयामांची तोडमरोड करण्यासाठी जनमत बदलण्याच्या हेतूंनी आपले अंतर्गत/बाह्य शत्रू या तंत्रज्ञानाचा वापर करतील यात शंकाच नाही.हे तंत्रज्ञान सांप्रत बाल्यावस्थेत असल तरी झपाट्यानी विकसित होत असल्यामुळे लवकरच;संरक्षण विषयक आर्थिक आवंटन,माहिती,सज्जता,आंतरराष्ट्रीय हत्यार खरेदी व अंतर्गत उत्पादन प्रगती,सीमेवरील सैनिकी तैनाती,मनोवैज्ञानिक अपप्रचार,विपरीत अफवा फैलावणे या साठी,विविध सोशल मीडिया मंचावरुन याचा वापर केल्या जाईल.

कुटील फसवणुकीच्या संदर्भात विविध व्याख्या प्रचलित असल्या तरी “कृत्रिम माहीती तंत्रज्ञानाच प्रमुख अंग असलेल्या मशिन लर्निंग आणि जनरेटिव्ह ऍडव्हर्शियल नेटवर्क यांच्या सांगडीनी आपल्याला हवी असलेली कुठलीही बातमी,फोटो,ध्वनी/चित्रफीत,घटना,यातील वास्तवाची गंभीर अदलाबदल/ फसवणूक करून त्या ऐवजी  स्वयंधार्जिण आभासी जग निर्माण करण” ही त्याची सर्वमान्य व्याख्या आहे. कुटील फसवणुकीद्वारे स्वयंधार्जिण्या आभासी जगनिर्मितीच्या प्रोसेसमधे; एकमेकांशी स्पर्धा करतांनाच एकमेकांना पूरक असणाऱ्या दोन “मशीन लर्निग न्यूरल नेटवर्क” चा वापर केल्या जातो.जनरेटर या  पहिल्या नेटवर्कच्या माध्यमातून;खोट्या,बनावटी,नकली विदेचा (काउंटरफेट डेटा) वापर  करून खऱ्या विदेत (ओरिजिनल डेटा) असणाऱ्या फोटो,ध्वनीफीत,चित्रफीत यांची निर्मिती केल्या जाते. डिस्क्रिमिनेटर हे दुसर नेटवर्क,आवश्यक असणारी नकली विदा उपलब्ध करून देत. शोधलेली प्रत्येक नकली विदा (डेटा आयटरेशन), बनावटी फोटो,ध्वनीफीत,चित्रफीतीला खऱ्या विदेच्या प्रगत स्वरूपात (इन्क्रिझिंगली रियलिस्टिक डेटा) आणण्याला मदत करते.

या दोन्ही नेटवर्क्समधे असलेल्या प्रचंड चुरसीमुळे; एक खोटा (काउंटरफेट) फोटो,ध्वनीफीत, चित्रफीत निर्माण करण्यासाठी अक्षरश: हजारो/ लाखो,खऱ्या/खोट्या विदांचा वापर केल्या जातो. जो पर्यंत डिस्क्रिमिनेटरही खऱ्या खोट्यातील (रियल अँड काउंटरफेट डेटा) भेद ओळखू शकणार नाही अशी पक्की नकली विदा निर्मिती (सॉलिड फेक डेटा जनरेशन) होत नाही तो पर्यंत ही प्रक्रिया सुरु असते. प्रसारमाध्यमांच्या सहाय्यानी जनमत आपल्या बाजूला वळवण्याची प्रक्रिया फार पूर्वीपासून सुरु आहे. पण मशीन लर्निंग/कृत्रिम माहिती स्रोताच सॉफ्टवेयर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगच्या सुलभतेमुळे आता  या संदर्भातील कुटील  फसवणूक; अतिशय कमी वेळात, कमी खर्चात आणि बेमालूमपणे केल्या जाते/ शकते आणि म्हणूनच ही प्रक्रिया आता भयावह रूप धारण करते आहे. एक नवखा,अबोध ऑपरेटर सुद्धा, इंटरनेटवरून या बाबतच सॉफ्टवेयर लीलया डाउनलोड करून,उपलब्ध विदेच्या सहाय्यानी हव्या त्या  फोटो,ध्वनीफीत, चित्रफीतीची नकली विदा निर्मिती करू शकतो.

कुटील फसवणूकीचा वापर चांगल्या  कामासाठी देखील होऊ शकतो/करण्यात येतो. आयुर्वैज्ञानिक संशोधक, दुर्लभ/गंभीर रोग असलेल्या रोगी/रोगाच्या  “फेक मेडिकल इमेजेस” निर्माण करून आपल्या विद्यार्थ्यांना “डिसीझ डिटेक्शन अल्गोरिदम” संदर्भातील  प्रशिक्षण देतात.पण दहशतवादी,असामाजिक तत्व,शत्रू,आणि धार्मिक/राजकीय मंचाचा वापर करून देशात अशांतता/ अस्थिरता निर्माण करू इच्छिणारे समाजकंटक याच तंत्रज्ञानाचा वापर; वृत्तपत्र,चलचित्र वाहिन्या, पत्रक, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून राजकीय नेते,प्रशासक,प्रतिष्ठीत मान्यवरांच्या तोंडी स्वतःला हवे असलेले डायलॉग घालून किंवा ते कसे अयोग्य पद्धतींनी वागताहेत अशी प्रतिमा निर्माण करून, जनमानसावर विपरीत परिणाम करतात.अस केल्यामुळे;जनतेचा,सरकार/या माणसांवरील विश्वास कमी होतो,पासा पलटतो आणि अस्थिरता/अशांतता निर्माण होऊन देश खिळखिळा होऊ लागतो. २०२०मधे लडाखमधील गलवान खोऱ्यातील चीनी घूसखोरी संदर्भातील पंतप्रधानांच्या साध्या प्रतिपादनाचा अंतर्गत/बाह्य सोशल मिडियात कसा विपर्यास करण्यात आला आणि २०१६च्या  अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पना जिंकवण्यासाठी रशियानी अमेरिकेत जे गुप्त प्रचार अभियान  चालवल होत ते “डिसइन्फर्मेशन अल्गोरिदम”च सुंदर उदाहरण आहे.भविष्यात,खऱ्या वाटाव्या/वाटतील अशा ध्वनी/चित्रफीतीं बाबत फसवणुकीच्या घटना सर्रास केल्या जातील/होतील.

हे कस  होईल/केल्या जाईल हे पाहाण मनोरंजक असेल/आहे.उदाहरणार्थ; दोन समुदायांमधे धार्मिक/सामाजिक/राजकीय तेढ निर्माण करण्यासाठी आपल्या शत्रूला;सर्वमान्य,वजनदार,प्रतिशयथ नेत्याच्या भाषणाची तद्दन खोटी, ध्वनी व चित्रफीत  निर्माण करायची आहे. त्या नेत्यानी केलेल्या असंख्य भाषणांच्या जुन्या नव्या,उपलब्ध  ध्वनी/चित्रफीतींना गोळा करून सॉफ्टवेयरच्या माध्यमाद्वारे नवीनतम भाषणाची ध्वनी/चित्रफीत बनवल्या जाईल.त्यासाठी पहिले योग्य ते  भडकाऊ भाषण लिहिल्या जाईल. या भाषणाला लिपसिंक होऊन नेत्याच्या चेहेऱ्यावर हवे तसे भाव उजागर  करणाऱ्या फोटोचे तुकडे (क्लिप्स फ्रेम) शोधले जातील. फोटो,ध्वनी व चेहेऱ्यावरील भाव यांची सांगड घालण्यात येईल. हे भाषण खर की खोट  यातील फरक तो नेतासुद्धा ओळखू शकणार नाही इतपत फिनीस येईपर्यंत हे कार्य सुरूच राहील. ज्या वेळी अस फिनिस झाल्याची खात्री होईल त्या वेळी याच्या हजारो लाखो प्रती तयार करून त्या वितरित केल्या/सोशल मीडियावर टाकल्या जातील आणि धार्मिक/सामाजिक/राजकीय दंगे सुरु होतील. फेसबुक,ट्विटर किंवा इंस्टाग्रामवर; कुठल्याशा अश्लील चित्रफीतीत  एका मुलीच्या धडावर दुसरीच शीर चिटकवून दुसरीला बदनाम करण ही कुटील फसवणुकीची पहिली पायरी आहे.

आजकाल चलचित्र वाहिन्यांवर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझमच्या नावाखाली जो एकतर्फी तमाशा दाखवण्यात येतो ती  कुटील फसवणुक तंत्रज्ञानाची दुसरी पायरी आहे अस म्हटल्यास ते वावग होणार नाही.क्लासिफाईड इन्फर्मेशन हस्तगत करून त्याच्या तोडमरोडीनी राष्ट्रीय सुरक्षा प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह लावणे (२०२०मध्ये चीन गलवानमधे कुठपर्यंत आत आला याच चर्विचरण); व्यक्ती/मंच, समुदायाविरुद्ध अपप्रचाराचा धुराळा उडवणे (नुकतीच झालेली पश्चिम बंगालमधील निवडणूक);सोशल मीडिया वर खोटे/फसवे फोटो टाकून आपल्या सोर्सेसची रिक्रुटमेंट करणे (हनी ट्रॅपिंग ऑफ सोल्जर्स/हाय ऑफिशियल्स),सुरक्षा संदर्भात सोशल मीडियावर प्रचलित साध्या व्हिडियोला सुरक्षादलांनी केलेल्या अत्याचाराच्या व्हिडियोत तबदील करणे (हिंसक जमावाच्या तावडीतून सैनिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मेजर  लीतूल गोगोईंनी काश्मिरमधे निदर्शनकर्त्याला जीपला बांधून फिरवण्याच्या कारवाईला मानवाधिकार उल्लंघनामधे तबदील करण्यात आल ती कारवाई), सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या ला जिहादी/आंतरराष्ट्रीय आतंकवाद्याच उदात्तीकरण करून सेनेनी “वॉर क्राईम” केल्याचा कांगावा करत लोकांचं रॅडिकलायझेशन करायच किंवा राजकीय/धार्मिक हिंसेला प्रज्वलित करायच (काश्मिरमधे बुरहान वानीच्या जनाज्याच उदात्तीकरण किंवा ओसामा बिन लादेनच्या पाकिस्तानमधील खातम्यानंतर अमेरिकन लष्कराच्या विरोधात झालेली आंतरराष्ट्रीय निदर्शन आणि त्याचे परिणाम),राष्ट्रांतर्गत झालेल्या सरकारी कारवाईबद्दल जागतिक जनमत भडकवण्यासाठी व्हिडियो तयार करून अपप्रचार करण (काश्मिरमधून ३७०/३५ए कलम हटवल्यानंतर जगभरात झालेली भाषण/ हिंसक प्रदर्शन) हे सर्व प्रकार याच कॅटॅगरीत येतात.

या संकटाचा सामना करण्यासाठी संरक्षण/गृहमंत्रालयांनी; अशा प्रकारच्या कुटील फसवणुकीचा सेना/सुरक्षाबल आणि त्यांच्या कुटुंबियांवर काय परिणाम होईल,अंतर्गत/बाह्य शत्रू या तंत्रज्ञानाचा विकास  कसा व कीती करतो आहे आणि इन्फर्मेशन ऑपरेशन्स करण्यासाठी शत्रू  याचा वापर कसा करेल  याचा सामरिक आढावा घेण क्रमप्राप्त असेल/आहे. जर दिलेली बातमी,फोटो,व्हिडियोमधे अननुचीत/ अयोग्य, खोटी किंवा गुन्हेगारी स्वरूपाची आहे हे सिद्ध झाल तर कुटील फसवणूक करणारा त्याच पालकत्व स्वीकारायला नकार देईल/देतो.याला “लायर्स डिव्हिडंड:खोट्याचा फायदा” म्हणतात. भविष्यात,जस जस गंभीर फसवणुकीच तंत्रज्ञान,क्षेत्र/आवाका आणि लोकांच या बद्दलच ज्ञान वृद्धिंगत होत जाईल तसतस या फायद्याच प्रमाण वृद्धिंगत होईल.२०१७ मधे,राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पची भेट टाळण्यासाठी उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा,किम जॉन्ग अनच्या आजारपणाचे व्हिडियो प्रसारमाध्यमांमधे व्हायरल केलेत तेंव्हा जागतिक पटलावर “लायर्स डिव्हीडंड”चा पहिला राजकीय  वापर झाला.

आजमितीला,कुठल्याही स्पेशलाइझ्ड टूल्स विना कुटील फसवणूक शोधून काढण कठीण नसल तरी ज्या वेगानी हे तंत्रज्ञान विकसित होत आहे ते पाहाता नजदिकी भविष्यात ते अशक्य होईल. खाजगी  क्षेत्रात आपल्या प्रतिस्पर्ध्याला आर्थिक/औद्योगिक आघाडीवर लोळवण्यासाठी कुटील फसवणूक फार मोठ्या प्रमाणात केली जात असल्यामुळे या कॉर्पोरेट वॉरसाठी मोठ आर्थिक आवंटन केल्या जात.भारत सरकारनी देखील यात लक्ष घालून उपाय योजना करण अपरिहार्य होणार/होत आहे. डिफेन्स एडव्हान्स रिसर्च एजन्सीची स्थापना करून,संबंधित प्रमेयांच्या (अल्गोरिदम्स) मदतीनी फोटो/व्हिडीयो/बातमीची पडताळणी (इंटीग्रीटी असेसमेंट)  आणि पृथ:करण (अनालिसिस)  करून  ते कसे तयार करण्यात आले हे ठरवण्यासाठी मीडिया फॉरेन्सिक डिपार्टमेंट उभ कराव लागेल.हे डिपार्टमेंट;मिळालेल्या प्रत्येक ध्वनी/चित्रफीतीमधील छोट्यात छोटी चूक किंवा/आणि फरक (ऑडियो व्हिज्युअल इनकन्सिस्टन्सी) यांचा सखोल अभ्यास,पृथ:करण आणि पडताळणी करून त्यांची भौतिक (फिजिकल),सांख्यिक (डिजिटल) आणि माहिती (सिमँटिक) दृढता (इंटिग्रिटी) पडताळून पाहील. हे झाल्यावर या पडताळणीचा अहवाल लष्कर आणि हेरखात्यांकडे (ऑपरेशनल अँड इंटलिजन्स कम्युनिटी) पाठवण्यात येईल.

दुसरीकडे,मीडिया फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून मिळालेल्या वरील माहितीच्या खरेखोटेपणाची पडताळणी सिमँटिक फॉरेन्सिक डिपार्टमेंट करेल. माहिती दूषित आहे की नाही हे ठरवून त्याच विविक्षित वर्गीकरण करण्यासाठी;शोध (डिटेक्शन),विशेष गुणधर्म  (अट्रिब्युटस) आणि वर्गीकरण   (कॅरेक्टराइझ) करणारी अल्गोरिदम्स विकसित करावी लागतील.ही  अल्गोरिदम्स, गोष्टींमधील मिसमॅच,बॅकग्राउंड डिफरन्स,फेशियल एक्स्प्रेशन डिफरन्स,स्पीच टोन/डिलिव्हरी डिफरन्स,डिफरन्स इन बॉडी लॅंग्वेज  अशा बारीकसारीक गोष्टींची पडताळणी करतील.मीडिया/सिमँटिक फॉरेन्सिक डिपार्टमेंट शत्रूच्या अपप्रचाराला आळा घालण्यात सरकारची मदत करेल. या वित्त वर्षात अमेरिकेनी  यासाठी १९७ लाख डॉलर्स,रशियानी १२० लक्ष डॉलर्स व चीननी १८०लक्ष डॉलर्सच प्रावधान केल आहे.भारतात अशा आवंटनाच्या सुरवातीची अपेक्षा आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमीच वरचष्मा राखणारे डीप फेक जनरेटर्स  आपल्या डिटेक्शन टूल्सवर लवकरच मात करतील ही भीती सर्व राष्ट्रांना आहे. त्यासाठी सोशल मीडियानी फेक न्यूजची जबाबदारी स्वीकारून बातमीच उगमस्थान,वेळ आणि  उगमकर्ता यांची माहिती  सरकारला द्यावी असा सर्वांचाच आग्रह असतो. भारतही याला अपवाद नसल्यामुळे सरकारनी सोशल मीडियावर;रिस्पॉन्सिबिलिटी/अकाउंटेबिलिटी आणि  आणि करेक्शन/प्रोटेक्शन फ्रॉम मिसयुझचा   अंकुश लावण्यासाठी,इंटर मिडिएटरी गाईड लाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड  २०२१  (आयटी रुल्स २०२१) लागू केल. याच पालन न केल्यास,लॉ ऑफ अबेटमेन्ट अंतर्गत ते दंड/शिक्षेस पात्र ठरतील. ट्विटर विरुद्ध भारत सरकार, हा कोर्टात गेलेला वाद याच विचारसरणीचा परिपाक आहे. विचारवंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी लोकांच्या मते असा अंकुश लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्यविरोधी आहे.सरकारला याचा सुवर्णमध्य शोधावा लागेल.

भारत संबंधित कुटील फसवणुकीच्या संदर्भात काही प्रश्नांची उत्तर मिळण अपेक्षित आहे. एक) संरक्षण/गृह मंत्रालयांकडे शत्रूच कुटील फसवणूक तंत्र/तंत्रज्ञानाची आणि ते आपल्या सुरक्षा आयामांवर काय परिणाम करू शकतात याची सर्वंकष माहीती आहे का? दोन) अशा फसवणुकीचा परिणाम आपल्या सुरक्षेवर होऊ नये यासाठी याला तोंड देणारी यंत्रणा आपल्याकडे आहे का? नसेल तर केंव्हा सुरू होईल/होऊ शकेल? तीन) देशातील खाजगी/कॉर्पोरेट जगताचे  या बाबतचे संशोधन आणि विकासाचा अंगिकार करण्यासाठी ते क्षेत्र आणि संरक्षण/गृह मंत्रालयात या संबंधी समन्वयाचे प्रयत्न होताहेत का? चार) कुटील फसवणुकीचा परिणाम राष्ट्रीय सुरक्षेवर होऊ नये यासाठी अमलात येणारा/आणलेला कायदा आणि व्यक्तीगत अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैचारिक सर्जनशीलता आणि कृती स्वातंत्र्यावर  घाला तर घालणार नाही ना? पाच) बातमीच उगमस्थान जाहीर करण्यास सोशल मीडियानी नकार दिल्यास सरकार काय कारवाई करेल? जर सोशल मीडियानी  होकार दिला तर सरकार “इंडिव्हिज्युल प्रायव्हसी” अबाधित ठेवण्याची हमी देईल का? सहा) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजच उगम आणि वितरणाची जबाबदारी कोण व कशी निश्चित करेल? सात) शत्रूंच्या कुटील फसवणूक तंत्राची माहिती जनतेला कळावी यासाठी सरकार काय,कसे व कोणते प्रयत्न करेल/करते आहे? आठ) आर्टिफिशियल इंटलिजन्सच्या साहाय्यानी  बनवलेल्या,फेस स्वॅपिंग टेक्नॉलॉजीमुळे जटिलते कडे झुकणाऱ्या  आणि जे कधी झालच नाही ते अगदि खऱ्यासारख दाखवणाऱ्या हायपर रियलिस्टिक व्हिडियोला ओळखून त्यांना न्यूट्रलाइझ करण्याची क्षमता सरकारमधे आहे का? नऊ)  या आधी फेक व्हिडियोंचा उपयोग राजनेते,नट,प्रख्यात व्यक्तींच चरित्रहनन करण्यासाठी होत असे. या पुढे कोर्टातील साक्ष,रिव्हेंज पॉर्न क्लिप्स, राजकीय उलथापालथ,आतंकवादी प्रचार/अपप्रचार आणि खोट्या बातम्यांसाठी करण्यात येईल याची कल्पना प्रशासनाला आहे का आणि असल्यास त्यावर उत्तर देण्यासाठी त्यांची संसाधन तयार आहेत का? दहा) असामाजिक तत्व,शत्रू राष्ट्र/संघटना,फसवेगिरी करणाऱ्या व्यक्ती/संघटना आणि टेलिव्हिजन कंपन्या/मीडिया/वृत्तपत्र ही चार अंग फसवणूक तंत्रज्ञान वापरतात. त्याच्यावर अंकुश कसा लावायचा याची योजना/धोरण निश्चिती झाली आहे का?

आपल्या निहित स्वार्थासाठी दुसऱ्याच्या व्यक्तिगत फसवणूकीची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. नंतर याचा वापर व्यापारी प्रतिष्ठानांकडून होऊ लागला. हे काम मॅन्युअली होत असल्यामुळे त्यात फिनिस नव्हता आणि ते लवकरच उघडकीस येत असे. संगणकीय तंत्रज्ञानामुळे झपाट्यानी विकसित झालेल्या कुटील फसवणुकीच तंत्रज्ञान,आता याचा वापर सामरिक दृष्ट्या होईल.२०००च्या पहिल्या दशकात अस्तित्वात येऊन दुसऱ्या दशकाच्या शेवटी पूर्णपणे विकसित झालेल्या आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे कुटील फसवणूक संगणकीय तंत्रज्ञानाला मोठा बूस्टर डोझ मिळाला.जे काम करायला खूप किंमत,परिश्रम आणि वेळ लागत असे ते काम आता काही दिवसांमधे होऊ लागल.कुटील फसवणुकीला आळा घालण्यासाठी,कोणाच्याही आक्षेपांना डावलून,सर्व अडथळ्यांना बाजूला सारून,यथोचित कायद्याची संरचना करून  ते त्वरित अमलात आणणे ही काळाची गरज आहे. यासाठी डिफेन्स/कॉर्पोरेट पॉलिसींच निर्धारण,जनतेच प्रशिक्षण आणि पलटवार तंत्रज्ञानाचा विकास अपरिहार्य असल्यामुळे, सजग भारत सरकार या बद्दल योग्य ती कारवाई करेल/करत असेल यात शंकाच नाही.

२३/०६/२१ : १६,भगवाघर कॉलनी,धरमपेठ,नागपूर,१० : ९४२२१४९८७६/abmup५४@gmail.com.