70 हजार कर्मचाऱ्यांचा संप मागे …

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10534*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

171

70 हजार कर्मचाऱ्यांचा संप मागे 

गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप प्रकरणी तडजोड

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर- आज राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या बरोबर चर्चा केली व संप प्रकरणी तडजोड घडवून आणली. झालेल्या समझोत्यानुसार आशाताईंना 1.7.2021 पासून 1500 व गटप्रवर्तकांना 1700 रुपये दरमहा रुपये वाढ मिळणार आहे. त्यापैकी माहिती संकलन व सादरीकरण या कामी आशांना दरमहा 1000 व गटप्रवर्तकना 1200 रुपये  निश्चित व कायमस्वरूपी वाढ असून 500 रुपये कोविड प्रोत्साहन भत्ता म्हणून मिळणार आहे. तसेच पुढील वर्षी 1.7.2022. पासून आशा व गटप्रवर्तकांना 500 रुपये निश्चित व कायमस्वरूपी वाढ मिळणार आहे. याप्रकारे आशा वर्करांना 2000 व गटप्रवर्तकांना 2200 रुपये वाढ मिळण्याचा समझोता आज दि.२३ जून रोजी करण्यात आला. आशां व गटा प्रवर्तकांच्या कामकाजा बाबत व सेवाशर्ती बाबत अभ्यास करण्यासाठी यशदाची समिती नियुक्त करण्यात येईल व या समितीवर आशा व गटप्रवर्तक संघटनांचे प्रतिनिधी असतील. राज्यातील  नगरपालिका व महानगरपालिका नगर पंचायतीने कोवीड कामासाठी आशा व गटप्रवर्तक यांना प्रोत्साहन भत्ता  देण्याबाबत शिफारस करण्यात येईल. व्हॅक्सिनेशन च्या मोहिमेमध्ये सोशल मोबिलाइजर व  ग्राउंड मॅनेजमेंट या प्रकारची कामे करण्यासाठी 200 रुपये प्रति दिन भत्ता देण्यात येणार आहे.  ग्रामीण रुग्णालय व  जिल्हा रुग्णालयात रुग्णांना घेऊन जाणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांसाठी आशा निवारा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आशा यांचे मानधन व मोबदला यांचा तपशील त्यांना  लेखी देण्यात येणार आहे. कोरोना बाधित  होऊन मयत झालेल्या आशा यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये विमा मिळण्यासाठी तातडीने कारवाई करण्यात येईल. आशा व त्यांच्या कुटुंबियांना जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येईल. एक एन एम व जीएनएम साठी प्रशिक्षण देऊन भरती करण्यासाठी संधी देण्यात येणार आहे .आशा व गटप्रवर्तकांवर वर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल. संपा केल्याबद्दल आशा व गटप्रवर्तक यांविरुद्ध कुठलीही कारवाई होणार नाही व वेतन किंवा मोबदल्यात कपात होणार नाही. वरील प्रमाणे मागण्याबाबत एकमत होऊन आज समझोता करण्यात आला. महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने एम ए पाटील, डॉ. डी.एल.कराड, राजू देसले, शुभा शमीम, श्रीमंत घोडके, शंकर पुजारी, सुवर्णा कांबळे, राजेश सिंग यांनी चर्चेत भाग घेतला. शेवटी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी संघटना प्रतिनिधींचे व संघटना प्रतिनिधींनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले.