Home Breaking News ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकरिता २६ जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकरिता २६ जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन

0
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकरिता २६ जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर- मराठा आरक्षणा पाठोपाठच आता राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील तापताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. तर, आज भाजपाची देखील या अनुषंगाने बैठक पार पडली, या बैठकीनंतर पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेत, २६ जूनरोजी भाजपा राज्यभरात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. तर, आता रस्त्यावर उतरू, न्यायालयात जाऊ पण ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला इशाराही दिला. पत्रकारपरिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले की, पंकजा मुंडेंनी सांगितलेलं खरं आहे, आज आम्ही सर्व ओबीसी नेते या निकषावर आलो आहोत, की या महाराष्ट्र सरकारला ओबीसींचं आरक्षण द्यायचं नाही. म्हणून २६ जून रोजी महाराष्ट्रात एक हजार ठिकाणी भाजपा आंदोलन करेल. गरज पडली तर आम्ही सर्वजण पुन्हा न्यायालयात जाऊ आणि या सरकारला ओबीसी आरक्षण देण्यासाठी भाग पाडू हे आम्ही आज ठरवलं आहे. या सरकारने ओबीसी आरक्षण घालवलं, या सरकारने ओबीसींवर अन्याय केला आणि आता नौटंकी करत आहेत. याचा आम्ही निषेध करतो आणि आता रस्त्यावर उतरू, न्यायालयात जाऊ पण ओबीसी आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. या निर्णयावर आम्ही सर्वजण आलेलो आहोत यावेळी बावनकुळे यांनी सांगितले़.