
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर खासदार संभाजी भोसले यांच्याकडून मराठा आंदोलन स्थगित
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर खासदार संभाजी भोसले आक्रमक झाले होते. त्यानंतर त्यांनी १६ जूनपासून कोल्हापुरातून मुक मोर्चाला सुरुवात केली. मात्र, राज्य सरकारने आता त्यांना आश्वासित केलं असून आठवड्याभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
कोल्हापुरातून बुधवारपासून मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार खासदार संभाजी भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मराठा समन्वयांसोबत बैठक घेतली. यावेळी बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, सतेज पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक उपस्थित होते. या बैठकीनंतर खासदार संभाजी भोसले यांनी हे आंदोलन पुढील दोन आठवड्यांसाठी स्थगित केल्याची घोषणा केली असल्याची माहिती मिळाली आहे.
या बैठकीनंतर मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, आम्ही या मागणीसाठी पुन्हा सुप्रीम कोर्टात आम्ही जाणार आहोत. रिव्ह्यू पीटीशन नुसतं फाईल करून अर्थ नाही. 50% मर्यादा घालण्यात आली आहे. या बाबी पाहाव्या लागतील. आठवडाभराच्या आत पिटीशन दाखल झाली पाहिजे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे, असं चव्हाण म्हणाले.
चव्हाण यांनी सांगितलं की, आजच्या बैठकीत खासदार संभाजीराजे यांनी सात मागण्या केल्या. हॉस्टेल उपलब्ध करून द्यावेत अशी त्यांची मागणी होती. आम्ही 23 जिल्ह्यात त्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहोत. कालबद्ध कार्यक्रम म्हणून आम्ही हे करू. मुख्यमंत्री या विभागाचा आढावा घेऊन कारवाई कशी होते हे पाहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, कोपर्डी विषय न्यायप्रविष्ठ आहे. शासनाने प्रक्रिया पूर्ण केली आहे. लवकरात लवकर केस लागावी हा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर छत्रपती संभाजीराजे व मराठा क्रांती मोर्चा यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे.

