कुंभमेळ्यात घेतलेल्या 1 लाख कोरोना चाचण्या बनावट
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : हरिद्वार – देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भाव असतानाही हरिद्वार येथे भरलेल्या कुंभ मेळ्यातील अनेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले होते. मात्र, यातील बहुतेक रिपोर्ट हे बनावट आणि खोटे असल्याचे आता उत्तराखंडच्या आरोग्य विभागाने केलेल्या प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.
आरोग्य विभागाने याबाबत 1600 पानांचे स्पष्टीकरणही दिले आहे. कुंभ मेळ्याच्या काळात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी तब्बल 1 लाख कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट बनावट असल्याचे यात सांगण्यात आले आहे. यातीलच एक उदाहरण म्हणजे, एकच फोन नंबर तब्बल 50 लोकांच्या नावापुढे रजिस्टर करण्यात आला आहे. दुसरी बाब म्हणजे या सर्वांसाठी एकच अँटीजन कीट वापरले गेले असून यातच 700 जणांची चाचणी केली गेली आहे. यात देण्यात आलेले पत्ते आणि नावंही पूर्णपणे काल्पनिक असल्याचे आढळले आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हरिद्वारमधील घर क्रमांक 5 मधील एकाच घरातून 530 जणांचे सॅम्पल घेतल्याची यात नोंद आहे. एकाच घरात 500 लोक राहाणे शक्य आहे का? असा प्रश्नही यानंतर उपस्थित झाला आहे. यात देण्यात आलेले इतर पत्तेही विचित्र आहेत. ज्यांचा कुंभ मेळ्याशी काहीही संबंध नाही.

