ना. केदारांच्या आढावा बैठकीत वातावरण इतके तापले,  संतापलेले आ. सावरकर कार्यकर्त्यांसह निघून गेले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10171*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

167

ना. केदारांच्या आढावा बैठकीत वातावरण इतके तापले, संतापलेले आ. सावरकर कार्यकर्त्यांसह निघून गेले

-आढावा बैठकीत खुर्चीसाठी झाली वादावादी

विदर्भ वतन, नागपूर : कामठी तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने राज रॉयल लॉन, कामठी येथे सोमवारी (१४ जून) राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी बैठक बोलावली होती. बैठकस्थळी शिष्टाचारानुसार (प्रोटोकॉल) बसण्याची व्यवस्था नसल्याचे सांगत भाजपचे आ. टेकचंद सावरकर यांनी आक्षेप घेतला. बोलण्याची संधी नाकारण्यात आल्यामुळे सावरकर आक्रमक झाले. येथे उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सावरकरांना बसण्यास सांगितले असता या दोघात शाब्दिक खटके उडाले.
आमदार आशिष जयस्वाल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, जि. प. मुख्याधिकारी योगेश कुंभेजकर, सभापती तापेश्वर वैद्य, नेमावली माटे, उज्ज्वला बोढारे, भारती पाटील, सरपंच, प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी बैठकीला उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठयाच्या कामांसह कामठी व मौदा तालुक्यातील वनजमिनीचा प्रश्न, पांदण रस्ते, भूमिअभिलेख, नाला खोलीकरण, अर्धवट शासकीय योजना व इतर सर्व शासकीय योजनांचा आढावा केदार यांनी टप्प्याटप्याने घेतला.
या बैठकीत कुठल्याही शासकीय व संवैधानिक पदावर नसलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व्यासपीठावर मुख्यस्थानी बसविण्यात आले होते. संविधानिक पदावर असलेल्या सदस्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही, असे सांगत भाजपाचे आमदार टेकचंद सावरकर यांनी संताप व्यक्त केला. ही शासकीय बैठक की काँग्रेस पक्षाचा मेळावा? असा सवाल उपस्थित करीत बैठकीतून आपल्या पक्ष पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांसह निघून गेले.

कामठीत वादविवाद नवे नाहीत –
लोकप्रतिनिधींना बोलण्याचा अधिकार आहेच. पण, त्यांनी उगाच आपल्या प्रतिष्ठेचा बाहू करून सर्वसामान्यांवर लोकप्रतिनिधींनी अन्याय करू नये, असे आवाहन ना. सुनील केदार यांनी केले. दरम्यान, कामठी मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचा प्रकार नवा नाही. सुरेश भोयर काँग्रेसकडून विधानसभेचे उमेदवार झाल्यानंतर विविध विषयांवर येथे काँग्रेस आणि भाजप पदाधिका-यांत खटके उडाले होते.

शाब्दिक वादानंतर सावरकर निघून गेले-
बैठकीला आ. सावरकर यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. बैठकस्थळी लोकप्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था प्रोटोकॉलनुसार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. ते बैठकस्थळी शेवटी बसले. काही वेळानंतर त्यांनी मंत्री केदार यांना आपल्यालाही बोलायचे आहे, असे सांगितले. यावरही केदार आणि त्यांच्यात मोठया आवाजात चर्चा झाली. याचदरम्यान उपस्थित काँग्रेस पदाधिका-यांनी आवाज चढविला. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर सावरकर निघून गेले.