Home नागपूर देहमूठीतील शब्दशिल्प..- हनुमंत चांदगुडे

देहमूठीतील शब्दशिल्प..- हनुमंत चांदगुडे

0
देहमूठीतील शब्दशिल्प..- हनुमंत चांदगुडे

देहमूठीतील शब्दशिल्प..

रुढ झालेल्या रुढी व रिती रिवाजांच्या अगणित परिमाणाने इथल्या माणसांच्या
संवेदना बोथट करत, समस्त स्त्री वर्गाला दोलायमान स्थितीत न्हेऊन
अस्थिरतेच्या व जातीपातीच्या  उंबरठ्यावर जखडून ठेऊ पहात असताना, सुख
दुःखाच्या चिमटीत गवसलेल्या राईएवढ्या सुखाची अपेक्षा सुध्दा
पर्वताएवढ्या दु:खावर मात करण्याची क्षमता निर्माण करु शकते.. याचे या
विश्वातील विश्वासू उदाहरण द्यायचे झाले तर आपण स्त्रियांच्या जन्मापासून
मृत्यूपर्यंत नव्हे तर मृत्यूनंतर पर्यंतचा प्रवास समजून घेणे आवश्यक
आहे….
इब्रत जपत संसाराचा गाडा ओढत असताना, पोटाची खळगी भरण्यासाठी
करावा लागणारा संघर्ष प्रथा परंपरांच्या व जातीधर्माच्या बेडीत कैद होऊन
आयुष्याभरात आपल्या वाट्याला आलेली गुलामगिरी झुगारुन देहातीत बंधनात
जखडलेली स्त्रियांची घुसमट भेदण्याची खरी उमेद म्हणजे खरी देहमूठ……
एका बी ला आधी गाडून घ्यावं लागतं, रुजावं लागतं, अंकुरावं लागतं..
तेव्हा कुठे एखादा हिरवा अंकुर नव्या वाटा निर्माण करत गगणभरारी
घेण्याच्या विचाराने वाढत जातो ती वाढत जाण्याची वृत्ती म्हणजे
देहमूठ…..
ओबडधोबड दगडाला तो तडकणार नाही अशा बेतानी एखादा शिल्पकार ज्या
नजाकतीने त्या दगडाचे एक सुंदर शिल्प घडवतो तेव्हा पाहणारे अवाक होऊन
जातात आणि म्हणतात की ‘अरे हे जे सुंदर शिल्प आहे ना ते शिल्प घडवण्याआधी
त्यासाठी लागणारा जो दगड होता. तो दगड माझ्या जवळ होता.. अनेक दिवस..
अनेक वर्ष किंवा अनेक पिढ्या…
आपली नेमकी तीच स्थिती असते… शिल्प घडवण्यासाठी जो दगड लागतो तो
आपल्याजवळ कुठेतरी अनेकदा पडून असतो परंतू त्या दगडाचे एखादे सुंदर शिल्प
होऊ शकते याचा विचार आपण कधीच करत नाही. कारण असा विचार करण्यासाठी
आपल्याकडे त्या शिल्पकारासारखी नजर व कसब नसते.. ती नजर व कसब असेल तर
आपण नक्कीच एखादे सुंदर शिल्प घडवू शकतो हे मात्र नक्की… मग ते शिल्प
दगडाचेच असेल असेही नाही.. ते शब्दशिल्प सुध्दा असू शकते… अशीच
आयुष्याला आकार देण्यासाठी व आपल्या जीवनाचा रथ पुढे खेचत घेऊन
जाण्यासाठी आयुष्यातील प्रत्येक क्षण संघर्ष करण्याची उमेद मनात ठेवून,
दु:खाच्या ओबडधोबड दगडात सुखाची शिल्प असतातच हा ठाम विश्वास मनात
असल्याशिवाय अशी शब्दशिल्प घडू शकत नाहीत… परंतू कवयित्री डाॅ, पल्लवी
बनसोडे यांच्या देहमूठ वाचताना अशी पंचावन्न शिल्प मला अनुभवता आली….
पाहता पाहता ओबडधोबड दगडांची सुरेख शिल्प होतात अगदी त्याच
सहजतेने शब्दांचे शिलालेख व्हावेत.. ते रसिकांच्या अंतरंगात कोरले
जावेत… आशयसमृध्दीचा रंग गडद होत जावा.. प्रतिमा- प्रतिकांच्या
कलाकुसरीने चपखल ठाशीव होत जावे… याची प्रचिती वाचकाला ते शब्दशिल्प
वाचताना आली तर लेखनीला अमरत्व प्राप्त होण्यापासून कोणीच रोखू शकत
नाही….. पहा…

पर्णदेठी सावरते
अंग अंग इवलेसे
वा-यासंगे खेळताना
लाज लाजे कवडसे….

झाडाचे खोड.. खोडाला फांदी… फांदीला डहाळी… डहाळीला देठ… देठातून
कोवळेसे पान अंकुरावे अन् ते वा-याच्या मंद झुळकीने लयबद्ध झुलावे…
त्या झिळमिळ वा-यात उनसावलीचा खेळ सुरु होऊन त्या उनसावलीच्या खेळात
कवडस्यांनी लाजून चूर व्हावे, अगदी असेच अनेक सुखदुःखाचे कवडसे स्त्री
च्या वाट्याला नेहमीच येत असतात हे सांगताना कवयित्री म्हणतात…

होते बोहनी कधीची
कधी होते लयलूट
शेजेवरी कुंतलात
भरजरी देहमूठ…….

किंवा

मौनसाक्षी आभाळाची
एकलीच भोळी माया
उपरट्या संसाराची
ऊन ऊन ऐनछाया……

मौनसाक्षी आभाळ, उपरट्या दिशेला वाहू लागले की संसारांची दुर्दशा होऊन
दु:खाचा वनवा अन् कर्जाचा डोंगर वाढत जाणारच .. या वनव्यात किंवा
निखा-यात स्त्रीला  तीचा जोडीदार सोडून गेला तरी ती मात्र कपाळावर किंवा
हातावर गोंदलेल्या गोंदणासारखी शिल्लक राहते.. हे सांगताना

निखा-यात उरतोच
रिक्त भुकेचा वणवा
तरी जगतेच बाई
दारी मागून जोगवा…

किंवा

नाही मारत कधीही
मिठी ती रे मरणाला
जगण्याचा शाप भाळी
तिच्या मुक्त प्राक्तनाला….

असे लिहून जातात अन् देहमूठ उलगडत जाते…. वाचक हो… मी हे लिहीत
असताना वर दिलेल्या ओळी फक्त दोन कवितेतील आहेत…. अशा पंचावन्न कविता
या संग्रहात आहेत… प्रत्येक कवितेवर लिहिण्याचा मोह होतो आहे परंतू आपण
स्वतः या कविता वाचाल तेव्हा आपणासही असाच मोह होईल एवढी सुंदर ही देहमूठ
आहे… नक्की वाचा…. तुर्तास थांबतो… कवयित्री डाॅ पल्लवी बनसोडे व
परिस पब्लिकेशन यांनी एक सुंदर काव्यसंग्रह रसिकांसाठी उपलब्ध करुन
दिल्याबद्दल खूप खूप शुभेच्छांसह धन्यवाद….

– हनुमंत चांदगुडे

देहमूठ : कवितासंग्रह
कवयित्री: डाॅ.पल्लवी परुळेकर-बनसोडे
परिस प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ:विशाल फसले-पाटील
पृष्ठे: ८० मूल्य १४०रु.